बोईसर मध्ये नियम धाब्यावर बसवत विश्वास फाउंडेशन तर्फे होणार दांडिया रास
बोईसर : ( संतोष घरत) - पारशी जरतोडी अंजुमन ट्रस्टचे मैदान जे बोईसर सर्कस मैदान म्हणून प्रसिद्ध आहे.ह्या भूखंडावर वर्षभरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पडत असून या मैदानावर असे कार्यक्रम आयोजित करीत असताना बोईसर ग्रामपंचायत देखील कानाडोळा करत असल्याचे जनतेकडून बोललेले जात आहे.
बोईसर शहराचे वाढते नागरीकरण तसेच बोईसर- पालघर पासून ते डहाणू पर्यंत च्या परिसरातील ग्रामस्थांची नाळ बोईसर शहराशी जोडलेली असताना उत्सवामध्ये चित्रालय बोईसर, ओस्तवाल बोईसर नवापूर नाका - अवधनगर हा परिसर गजबजलेला असतो. यावेळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना या प्रसिद्ध भल्या मोठ्या सर्कस मैदानावरील होत असलेल्या कार्यक्रमामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पारसी जरतोडीअंजुमन ट्रस्ट च्या मैदानावर दिनांक १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दरम्यान बोईसर दांडिया रासचे आयोजन विश्वास फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमाने करण्यात आलेले असून आयोजक यांच्याकडून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येणाऱ्या व या कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी कुठल्याही प्रकारची वाहन तळ व्यवस्था केल्याची दिसत नाही.बोईसर तारापूर ह्या मुख्य रस्त्याच्या वळणावर सिडको येथे मुख्य प्रवेशद्वार ठोकल्यामुळे पादचारी नागरिकांना तसेच आजूबाजूच्या नागरी वस्तीला नाहक त्रास सहन करावा लागणार असून प्रवेश द्वार ज्या ठिकाणी लावले आहे, त्याला बांबू बांधून तो थेट अकरा केवीच्या विद्युत पुरवठा खांबाला बांधलेला असल्याने ह्या कार्यक्रमांमध्ये यदा कदाचित पाऊस पडला तर त्या प्रवेशद्वाराला करंट येऊन तिकडे मोठी घटना घडू शकते.
गणेश उत्सवाच्या वेळेस वाहतूक नियंत्रण शाखेने या ठिकाणी एक पदरी रस्ता सुरू केल्याने सुरक्षित अशी वाहतूक होत होती. सर्कस मैदानावर होणाऱ्या दांडिया रास हा नऊ रात्र सतत चालणार असल्याने त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.
बोईसर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीकडून सिडको बायपास रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बेशिस्त फेरिवाल्यामुळे सिडको बायपास रस्तावर रोज सायंकाळी एक ते दोन तास वाहतूक कोंडी होतच असून अशातच बोईसर दांडिया रास यांच्याकडून रस्त्यावरच प्रवेशद्वार उभारल्याने नागरिकांना अपघातास निमंत्रण देऊन जिवावर बेतले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
सदर कार्यक्रमाकरिता तात्पुरता विद्युत पुरवठा विश्वास वळवी यांच्या नावे घेतला असून तो रशीच्या साह्याने फक्त भिंतीला लटकवलेला आहे. त्याकरिता कोणतीही अशी भक्कम सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याचा सप्लाय हा हार्मोनिच्या सोसायटी मधून दिला असून ह्या ठिकाणी सुद्धा यदाकदाचित पाऊस सुरू झाला तर त्याचा करंट हा भिंतीला लागून तिथेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन त्याची चौकशी करून आयोजकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.
Post Views: 188