वाड्.मय म्हणजे मानवी मनाच्या आंदोलनाचा आलेख - संमेलनाध्यक्ष मा. सुरेश पाचकवडे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
31 Dec 2024, 8:23 AM
नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा म. फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे पाहुण्यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला.
वाड्.मय म्हणजे मनाचा आरसा! मनुष्याच्या वाणीतून, लेखणीतून जो प्रवाही उद्गार निघतो, तो साहित्यात चिरंतन होऊन जातो. साहित्य हे वेदनेच्या गर्भातून जन्माला येते. तो मानवी मनाच्या आंदोलनाचा आलेख असतो. लेखकांनी जीवनदृष्टी देण्यामध्ये लेखनाचा मोठा वाटा उचलावा, असे आवाहन संमेलनाध्यक्ष मा. सुरेश पाचकवडे यांनी केले.
आपल्या अवतीभवतीच्या समस्या, प्रश्न, विषयांचे संशोधन करून लेखकांनी लिहिते व्हावे, कवी-लेखकांनी ज्वलंत समस्यांवर व्यक्त व्हावे, असे विचार साहित्य महोत्सवाचे उद्घाटक दैनिक सकाळचे निवासी संपादक मा. प्रमोद काळबांडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विशेष अतिथी मा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी नवोदितांना संबोधताना म्हणाले की, जास्तीत जास्त वाचन व अध्ययन करून सकस साहित्यनिर्मितीचा विडा उचलावा. पत्रकार व समीक्षक मा. डी. बी. जगत्पुरिया यांनी भाषणातून लेखकांना विज्ञानवादी, परिवर्तनकारी साहित्यनिर्मिती करण्याचे आवाहन केले. जपान येथील कादंबरीकार उर्मिला देवेन यांनी विदेशात राहूनही मायमराठीच्या संवर्धनासाठी आम्ही मराठी भाषिक विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. कला गौरव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बानाईत यांनी साहित्याबरोबरच लोककलेचे संगोपन व्हावे; असे म्हणाल्या. ज्ञानपथ प्रकाशन, संपादक मा. शंकर घोरसे व कार्यकारी संपादक मा. प्रभाकर तांडेकर प्रदत्त यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली निर्मिलेल्या तसेच देश-विदेशातील साहित्याला समाविष्ट केलेल्या अक्षरठेव या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक आयोजक शंकर घोरसे यांनी केले. उद्धाटन सत्रात विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात जलंब (बुलडणा) येथील मंगलाताई घोपे यांचा आदर्श संरपंच म्हणून सत्कार करण्यात आला. वृद्धसेवेकरिता मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथील मा. प्रदीप चंदनबटवे तसेच कौमार्य चित्रपटाचे गीतकार मा. संजय बंसल, उमरेड व सामाजिक कार्यकर्तें मा.अनंत भारसाकडे नागपूर यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
उद्घाटन समारंभात लेखिका उर्मिला देवेन यांच्या द गेम ऑफ अफेयर या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. मा. मनोज भारशंकर, अबुधाबी, युएई (कवितासंग्रह: मायचा पदर) भाष्य मा. दिपक देशपांडे, परभणी, मा. प्रभाकर तांडेकर प्रदत्त, नागपूर (हायकूसंग्रह- कृतिकाई) भाष्य- प्रा. शैलेश निकोसे, वर्धा. मा. डॉ. संध्या पवार, नागपूर (कवितासंग्रह- शब्द) भाष्य - मा. रेखा दंडिगे, नागपूर, मा. अर्चना धानोरकर, वर्धा (कवितासंग्रह : इंद्रधनू) भाष्य - प्रा. मीनल येवले, प्रा. विनय पाटील, वेलतूर (कवितासंग्रह: निनाद) भाष्य-प्रा. राजेंद्र कांबळे, नागपूर, मा. लीना भुसारी खैरकर, नागपूर (कवितासंग्रह: साज-प्रीतीचा) (चारोळी संग्रह: रसकुंज) भाष्य-मा. मंजूषा कऊटकर, कळमेश्वर मा. गणेश भाकरे, सावनेर (बालकवितासंग्रह: थेंबा थेंबाची कहाणी) मनोगत-मा. गणेश भाकरे, मा. डॉ. स्मिता मेहेत्रे, नागपूर (कवितासंग्रह : निशिगंधाचा दरवळ) (चारोळीसंग्रह :कॅलिडोस्कोप) भाष्य-मा. डॉ. लीना निकम, नागपूर मा. गणेश पांडे, नागपूर (चारोळीसंग्रह - चांदणवेल) भाष्य- वीणा पांडे, नागपूर. अशा अनेक पुस्तकांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
Post Views: 123