नॅशनल ट्रेकिंग कॅम्प, तिरुपती मध्ये एल.आर.टी. चा कॅडेट ओम भारती चा सहभाग
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2025, 1:10 PM
एन. सी. सी ग्रुप हेडक्वार्टर तिरुपती आंध्रप्रदेश बटालियनद्वारा दिनांक २५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नॅशनल ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्प कमांडर कर्नल सचेंद्र दहिया व डेप्टी कॅम्प कमांडर कर्नल विक्रम प्रसन्न या दोघांच्या मार्गदर्शना अंतर्गत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प्साठी भारतातील विविध राज्यातील ५०० हून अधिक एन. सी. सी. कॅडेट्स सहभागी झाले होते. प्रत्येक बटालियनमधील उत्कृष्ट कॅडेट्सला शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. या शिबिरासाठी अमरावती ग्रुप मधून १०२ कॅरेट्सची निवड करण्यात आली होती. यामध्ये ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाच्या १४ कॅडेट्सची निवड या कॅम्पसाठी झाली होती. श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोल्याचा कॅडेट ओम भारती यांची निवड या कॅम्पसाठी करण्यात आली होती. या कॅडेट्सला आंध्र प्रदेशच्या सामाजिक व सांस्कृतिक वारसाबद्दल तसेच विज्ञान व भौगोलिक स्थळांना भेट देण्याची संधी यामध्ये मिळाली. समुद्र सपाटीपासून ३२०० फूट उंचीवर ४७७६ पायऱ्या असलेल्या तिरुमल्ला तिरुपती देवस्थानापर्यंत ट्रेकिंग करून जाण्याचा वेगळा अनुभव कॅडेट्सला मिळाला. कॅडेट्सनी ट्रेकिंगचा एक भाग म्हणून श्री. वेंकीतेश्वरा प्राणीशास्त्र उद्यान, प्रादेशिक विज्ञान केंद्र, श्री. वागुलमाथा मंदिर आणि दिव्यारामम पार्कलाही भेट दिली. कॅडेट ओम भारती या कॅम्प वरून परत आल्यानंतर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे व एन. सी. सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष अभिजितजी परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा व इतर सर्व कार्यकारी सदस्यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
Post Views: 52