राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान सोहळा, कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन उत्साहात संपन्न
पुणे : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल आणि सर्जनशील पब्लिकेशन (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. जिजाबाई प्रभाकरराव चरडे समर्पित राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान सोहळा – २०२६, राज्यस्तरीय कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम निर्माण अजिंक्यतारा सोसायटी सभागृह, सिंहगड कॉलेजजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. प्रतिभा सराफ तर कार्याध्यक्ष म्हणून मा. अश्विनी निलेश अतकरे उपस्थित होत्या. उद्घाटन मा. डॉ. मंदा नांदुरकर यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून मा. पुष्पराज गावंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रभाकरराव चरडे, मा. शंकर घोरसे, मा. ॲड. डॉ. नीता कचवे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी कवयित्री सौ. नलिनी विजय पवार यांच्या ‘निसर्गछाया’ या कवितासंग्रहाचे तसेच कवी देवेंद्र शं. इंगळेकर यांच्या ‘हलूल बेटावरून’ या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांना उपस्थित साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात मेमसाहब या स्त्री विषयक कवितांचा विशेष अभिवाचन कार्यक्रम निरंजन मार्कंडेयवार यांनी सादर केला. या सादरीकरणाने उपस्थितांना विचारप्रवर्तक अनुभव दिला.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार – २०२६ देऊन गौरविण्यात आले. साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कला आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कवींनी सामाजिक, स्त्रीशक्ती, निसर्ग, मानवी भावना व समकालीन विषयांवरील कविता सादर केल्या. काव्यरसिकांनी कवितांना भरभरून दाद दिली.
कवी संमेलन अध्यक्ष पद शीतल राऊत तर प्रमुख अतिथी आबासाहेब कडू, प्रा.मधुकर वारभुवन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मनोहर व अमोल चरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक कवयित्री माधवी मोतलिंग, कवी रामदास गायधने, कवी विलास पुंडले, कवयित्री नलिनी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. शब्दवेल आगामी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी केले.
Post Views: 3