झीरो बजेट शेती हे शेतकऱ्यांच्या अन् बेरोजगारांच्या प्रश्नांचे उत्तर नाही -डॉ. नीलेश पाटील
जय अनुसंधान चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषी सुधारणा पुढे रेटण्यात अपयशी झाल्यानंतर अस्तित्वात नसलेल्या झीरो बजेट शेतीचा जयघोष करण्यात गुंतले आहेत.
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान अन् बाजारपेठांच्या मोकळीकतेची गरज असताना अस्तित्वात नसलेल्या झीरो बजेट शेतीची उपरती पंतप्रधानांना होणे हे शेतकऱ्यांच्या व युवकांच्या तोंडांना पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटना युवा आघाडी चे विदर्भ अध्यक्ष डॉ.नीलेश पाटील यांनी केले आहे.
कापूस उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून गुलाबी बोंड अळी च्या संकटाने त्रस्त आहेत.त्यांना जगात उपलब्ध असलेले अद्यावत जनुकीय तंत्रज्ञान युक्त बियाणे हवे आहेत.
तेलबियांचा देशात तुटवडा असून ही जनुक सुधारीत सोयाबीन बियाण्यांवर मात्र बंदी.तंत्रज्ञानाचा मार्ग अशा पद्धतीने अवरुद्ध केल्यामुळे भारतीय शेतकरी क्षमता असूनही जगाच्या परिवेशात मागे पडत आहेत.सोयाबीन ची उत्पादकता कमी असल्याने आपण जी.एम.सोयातेल, सोयापेंड ची आयात करतो पण भारतीय शेतकऱ्यांना मात्र बंदी.जनुक सुधारीत बियाण्यांवर,अगदी त्यांच्या चाचण्यांवरही बंदी असल्याने उत्पादकता कमी होण्या सोबतच लाखो कोटी रुपये दरवर्षी कीटकनाशकांवर शेतकऱ्यांच्या खिशातून खर्च होत आहे.जगाच्या तुलनेत आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च उगाचच वाढून उत्पादकता मात्र कमी होत आहे.या मध्ये शेतकऱ्यांना तर आर्थिक नुकसानाला सामोरे जावेच लागत आहे पण देशाचे चलन ही आयातींसाठी खर्च होत आहे.जैव तंत्रज्ञान पुढच्या काळात पोषण, आरोग्य सोबतच अगदी देशातील इंधनाच्या आयातीचा प्रश्न ही सोडवण्यास सक्षम असून मोठ्या प्रमाणात भारतीय युवका साठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता जैवतंत्रज्ञानात आहे.अशा परिस्थितीत अस्तित्वात नसलेल्या झीरो बजेट शेतीचा प्रतिगामी आग्रह व तंत्रज्ञाना बाबतची अनास्था देशाच्या अन्नसुरक्षा,शेतकऱ्यांचे जगणे व युवकांचा रोजगार या सर्व बाबतीत संकटे सोबत घेऊन शकतात.जय अनुसंधान चा नारा देणाऱ्या पंतप्रधानांना ही प्रतिगामी धोरणे शोभत नाही. शेती क्षेत्रातील युवकांनी झीरो बजेट पोथीचा हा अस्तित्वहीन जादूचा प्रयोग हाणून पाडावा व आपल्या व्यवसाय सुलभते साठी,रोजगाराच्या संधी साठी जैवतंत्रज्ञाना साठी आग्रही भूमिका घ्यावी असे आवाहन शेतकरी संघटना युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष डॉ.नीलेश पाटील यांनी केले आहे.
Post Views: 356