गुजरातमध्ये 400 कोटींचे ड्रग्स जप्त
पाकची घुसखोरी उधळली; बोट पकडली
गांधीनगर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. भारताच्या जल हद्दीत 6 चालकांसह पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली आहे. अल-हुसैनी नावाची पाकिस्तानी नौका असून, अधिकार्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ ही पाकिस्तानी नौका दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
संरक्षण विभागाकडून या कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. रविवारी रात्री गुजरातच्या समुद्रात ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ही बोट ताब्यात घेण्यात आली. या बोटीतून 77 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे 400 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोटीत सहा खलाशी होते. त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. ही बोट कच्छमधील जखाऊ बंदरात आणण्यात आली असून, पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या एका कारवाईत 21 हजार कोटी रुपये इतक्या किमतीचे 3 हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. मुंद्रा पोर्ट येथे डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केली होती. इराणमधील अब्बास बंदरातून आलेल्या कंटेनर्सची तपासणी केली असता हे तीन हजार किलो ड्रग्ज आढळून आले होते. कंटेनरमध्ये टॅल्कम पावडर असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला गेला होता. हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून पाठवण्यात आल्याचे व इराण, पाकिस्तान मार्गे गुजरातमध्ये पोहोचवण्यात आल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी मच्छिमार बोटीत ड्रग्ज आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Post Views: 232