नितेश राणेंची प्रकृती बिघडली; कोल्हापुरात उपचार सुरु
कोल्हापूर : भाजप आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. नितेश राणे यांच्या छातीत दुखत होते. तसेच मणक्यात तीव्र दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नितेश राणे हे शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्याने अटकेत आहे. त्यांच्या जामिनावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. पण त्याआधी त्यांची आज प्रकृती बिघडली आहे. नितेश यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी एक वैद्यकीय पथक विशेष लक्ष देऊन आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच काय उपचार करायचे याबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. तसेच तपासणीनंतरच नितेश यांना रुग्णालयात ठेवायचे की कोठडीत ठेवायचे याबाबत निर्णय होणार आहे. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण यादरम्यान आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. नितेश राणे यांना घेऊन पोलिसांचा मोठा ताफा सिंधुदुर्गातून गगनबावड्यात पोहोचला. गगनबावड्या घाटातून नितेश यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी कोल्हापूरमधील जिल्हा रुग्णालयाला छावणीचं रुप आलं होतं, इतका मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नितेश राणे यांच्यावर आता कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. मणका आणि छातीची तपासणी वैद्यकीय पथकाकडून करण्यात येत आहे. छातीत दुखू लागल्याने ओरसमधून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी रुग्णवाहिकामधून पूर्ण प्रवास झोपून केला. रुग्णवाहिकामधून उतरल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्यांना चालायलासुद्धा त्रास होत होता. त्यांच्या सध्या वैद्यकीय तपासण्या सुरु असून त्यामध्ये काय निदान होणार यावरुन पुढच्या उपचाराची दिशा ठरवण्यात येणार आहे.
Post Views: 324