ना लोकप्रश्नांची तमा ना विकासाची चिंता घाणेरडे राजकारण हाच धंदा !


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Mar 2022, 12:32 PM
   

रानटी अवस्थेतून उत्क्रांती होत होत पशुवत मानव माणूस बनला, व पुढे चांगल्या-वाईटांच्या परिनामांतील अ नुभवातून धडे धेऊन त्याची संवेदनशिलता जागृत झाली. पुढे त्याने माणूस होण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेऊन समाजातील समुहजीवनात प्रवेश केला. त्या परिक्षेत त्याला समुहजीवनातील एकोपा आणि त्याचे मानवी जीवनातील महत्व काय, प्रेम-बंधुभावातून जोपासलेला भाईचारा आणि परिवारीक आणि सामाजिक नाते संबंध काय याच्या प्रेरणा मिळून तो एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरायला लागला. त्यानंतरच्या प्रदिर्घ कालखंडानंतर या भारतीय संस्कृतीमध्ये आचार-विचार, दुरदृष्टी आणि सखोल ज्ञानाने परिपूर्ण महापुरूष निर्माण झाले, आणि त्यांनी मानवी जीवनमुल्यांचे धडे देत माणसांच्या हृदयातील प्रेरणा जागृत करून खरा माणूस होण्याची साद घातली. मात्र या साधनाकुंडातून परिपूर्ण मानसे तावून सुलाखून मोठ्या प्रमाणावर बाहेर आली नाहीत, परंतू बहुतेकांना सामाजिक जीवनातील आपली कर्तव्ये मात्र समजू लागली. महापुरूषांनी माणसाच्या मानसिक, वैचारिक आणि भौतिक विकासासाठी समाजात मानवतेची मंदिरं उभारण्याचा प्रयत्न केला. समाजदेवतेचा परिचय देऊन जनसेवा हिच इश्वरसेवा आणि त्या सामाजिक साधनेतच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास अंतर्भूूत असल्याचे आवर्जून सांगितले. परंतू येथील माणसांना मानवी जीवनमुल्यांचे अमृतस्नान घातल्यावरही तो कोरडाच राहिला. समाजवतेच्या मंदिरांचा कायापालट तर झालाच नाही. मग जिर्णोद्धारच नाही तर कळस चढणे दुरच!
मानवी जीवनाचे महत्व समजून निरोगी समाजव्यवस्था निर्माण करणे हे काम राजकीय आणि सामाजिक जीवनातील कर्त्या पुरूषांकडे सोपविण्यासाठी स्वतंत्र भारतात लोकशाही शासनव्यवस्था प्रस्थापित  झाली. संविधानानुसार राज्ये आणि देशातील शासनव्यवस्था निर्माण झाली. शासनामध्ये विराजमान झालेली सध्याची माणसे मानवी जीवनाच्या प्रवाहातून पुढे आलेल्या त्या माणसांचेच वारसदार आहेत. याच माणसांना “माणूस द्या मज माणूस द्या” म्हणत समाजासाठी तयार करण्याचा प्रयत्न करून राष्ट्रीय विकास साधण्याचे प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराजांसारख्या व देशातील अन्य राज्यातील थोर महापुरूषांनी केले. परंतू त्यांच्या या साधनेला तडा देऊन मतलबासाठी सिद्ध झालेल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील याच लोकांनी येथील माणसांच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला खिळ घातली आहे. त्यामुळे प्रगतीचा उच्चांकाच्या सद्गतीने होणारा प्रवास अधोगतीच्या उतारावर याच दुराचारी विचारांच्या विघातक राजकीय कंपूने नेऊन पोहचविला आहे. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत चर्चा, सुसंवादाला प्राधान्य देऊन प्रगतीची एक नवी दिशा निर्माण व्हावी यासाठी घटनात्मक तरतुदीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. त्याचा उपयोग करून सर्वांनी अन्याय, आणि अनैतिकतेला प्रतिबंध करून सुराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न घटनेला अभिप्रेत आहेत. त्यासाठीच सामाजिक प्रबोधन आणि लोकशाहीतील हक्क अबाधित ठेऊन विधायक विकासाच्या मार्गाने जनतेच्या भौतिक विकासाला पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षियांना शासनव्यवस्थेत स्थान देण्यात आलेले आहे. परंतू आज थोर महापुरूषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि उदात्त जीवनमुल्यांच्या शिकवणूकीने मंतरलेल्या या महाराष्ट्रातील आजच्या घाणेरड्या राजकारण्यांची नुसती चिखलफेक आहे. त्यामुळे ही विचारांनी उत्क्रांत झालेली माणसे आहेत की माणुसकी हरविलेल्या वेताळी वावटळी हा प्रश्न आज समाजाला पडलेला आहे. 
देशाच्या उच्चतम संस्कृती आणि महापुरूषांच्या कर्तृत्वाने व थोर विरांच्या पराक्रमाने अग्रेसर ठरलेल्या या मराठ्यांच्या महाराष्ट्राची येथील कृतघ्न, मतलबी राजकारण्यांनी फार मोठी वाताहात करून टाकलेली आहे. देशाच्या आणि राज्याच्या शासनव्यवस्थेमध्ये समाजाच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनातील सत्ताधार्‍यांसोबतच विरोधी पक्षाची योजना असून त्यांनाही घटनात्मक अधिकार बहाल करण्यात आलेत. परंतू त्या घटनेचा आणि दिलेल्या लोकप्रतिनिधीत्व अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हा राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवून विकासाला दिशा देण्यासाठी होताना दिसत नाही. विरोधी पक्षीयांना मिळालेले अधिकार हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीतील ब्रम्हास्त्र आहे. त्या अस्त्राचा उपयोग स्वतःचे दरारे निर्माण करण्यासाठी नाही. जनतेच्या प्रश्नांना मुठमाती देऊन स्वतःच्या लुटमारीसाठी राजसिंहासने बळकावण्यासाठी निश्चितच नाही, या मुल्ल्यांचा राजकारणातील माणूस म्हणविणार्‍या राजकारण्यांना आज विसर पडलेला आहे. त्यामुळेच देशातील स्वायत्त संस्थांना गुलाम बनवून  ज्या गदारोळाशी जनतेच्या कल्याण अकल्याणाचा काहीही संबंध नाही, अशा दिशेला त्यातील बाहूले इशारे करून सोडले जात आहेत. 
कोरोनासारख्या संकटग्रस्त काळात आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी शेतकरी प्रश्नांमध्ये आपल्या घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव करून प्रस्थापित सरकारच्या विकास आणि समस्या निर्मुलनकार्यात गतिरोधक निर्माण करण्याचे विघ्नसंतोषी खटाटोप महाराष्ट्रातील भाजपनेत्यांनी केलेले आहेत. त्यातून त्यांनी विरोधी पक्षाला मिळणारा आदर धुळीस मिळविला व त्या पदाला एका शुल्लक पातळीवर आणून ठेवलेले आहे. या देशात आणि राज्यात आम्हीच फक्त धुतल्या तांदळाचे निष्कलंक आणि प्रामाणिक बाकी सत्ताधार्‍यांसह सर्व पक्ष भ्रष्ट आहेत असे खोटे केविलवाणे वातावरण  निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वात जास्त जीवनमुल्ल्ये घसरविलेल्या भाजप या पक्षाचे सुरू आहेत. मन मानेल तशा चुकीच्या निर्णयांनी जनसामान्यांच्या जीवनात मरणासन्न वेदना निर्माण करणे, शेतकरी, श्रमिक, बेरोजगारांना भिकेला लावून त्यांच्या जीवनात अंधार निर्माण करणे, आणि सरकारी मालमत्ता विकून घसरलेला विकासदर सावरता येत नाही तरी खोट्या प्रचारातून देशवासियांची दिशाभूल करणे ही समाजधर्माची प्रतारणा करून कर्तव्याला काळीमा फासण्याचे अक्षम्य पापी अपराध केंद्रातील सत्ताधारी आणि महाराष्ट्रातील कुटील विरोधक करीत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने आपण तीकडे पश्चिम बंगालच्या वाघिणीने छत्तीस इंचीवाल्यानांही गारद केल्याने चवताळलेल्या भाजप नेत्यांनी खोटेनाटे कुंभाडं रचून आडवा येईल त्याला गारद करण्याची अमानविय वाटचाल सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना कचाट्यात पकडण्याकरीता कंगणा, सुशांत, प्रकरणे उचलणे आणि आता दिशा सालियनला चारित्र्यहनन करून मृत्यूपश्चात बदनाम करणे म्हणजे आपल्या चांडाळ राजकीय खेळ्यांसाठी कुटूंबातील इतरांची आयुष्येही उध्वस्त करण्यास मागेपुढे न पाहणारे अमानविय कसाई कोण असा प्रश्न विचारला तर याचे उत्तर सध्या भाजप आणि भाजपचेच नेते याशिवाय दुसरे कोणतेही मिळू शकणार नाही. म्हणजे हे उत्क्रांत झालेल्यांचे वंशज आहेत की उलट्या प्रवासाच्या अधोगतीची हवा लागलेली दुष्प्रवृत्त विघातक माणसे आहेत, हे ओळखणेही आता कठीण आहे. कारण मतलबाच्या राजकारणाची हुक्की आली की, हे विधायक विचारांची प्रवचने देणारे हभप व्हायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा वेड पांघरुन पेडगावला जाणार्‍या  या राजकारण्यांना जनतेने आता खड्यासारखे बाजूला करून त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना दिली पाहिजे. कारण यांना ना लोकप्रश्नांची तमा ना विकासाची चिंता फक्त घाणेरडे राजकारण हाच यांचा एकमेव धंदा बनलेला आहे.
संजय एम.देशमुख, मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  368


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व