आधुनिक शिक्षण बहुजनांपर्यंत नेण्याचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले
शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Apr 2022, 6:31 PM
कोल्हापूर : समाजातील घटकांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचवण्याचे काम डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले, असे गौरवोद्गार शाहू महाराज यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते. राजकारणापासून अलिप्त होऊन शैक्षणिक कार्य करण्याचा डॉ. डी. वाय. पाटील यांचा निर्णय खूप मोठा होता. केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपल्या संस्थांचा विस्तार केला आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. सह कणबरकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केल्याचे शाहू महाराज म्हणाले.

या पुरस्कारामुळे आपल्या मनात उपकृततेची भावना दाटली आहे. अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार आपल्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरुदक्षिणा दिली जायची; पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे. हे या पुरस्काराचे वेगळेपण असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील यांनी आवर्जून सांगितले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाची मानद डी. लिट. ज्यांना दिली त्या डॉ डी वाय पाटील यांना त्यांच्या गुरूंच्या नावाचा पुरस्कार देण्यात आल्याने हा विद्यापीठाच्या दृष्टीने भाग्याचा क्षण असल्याचे सांगितले.
मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी. ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. डी. आर. मोरे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गुरूंच्या नावाने पुरस्कार हा सन्मान - डॉ डी वाय पाटील
आपल्या गुरूंच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा सर्वात मोठा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आपल्या मनात उपकृततेची भावना दाटली आहे. अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार आपल्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरुदक्षिणा दिली जायची; पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे. हे या पुरस्काराचे वेगळेपण असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील यांनी आवर्जून सांगितले.
Post Views: 354