शाडू माती पासून गणपती निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


400 च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग; 14 सप्टेंबरला होणार निकाल घोषित
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Aug 2024, 10:47 AM
   

ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे आयोजन
अकोला- आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उपासनेसोबतच सकल कलांची देवता असलेल्या श्री गणेशाच्या गणेशोत्सवादरम्यान घरोघरी स्थापना केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती ह्या पर्यावरण पूरक असाव्यात तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी होणारे जल प्रदूषण टाळता यावे या उद्देशातून शाडू माती पासून गणेश मूर्ती निर्मितीची स्पर्धा शनिवार 24 ऑगस्ट रोजी जठारपेठ येथील स्व. सावरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 400 च्या वर स्पर्धक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बाल शिवाजी शाळेत घोषित केला जाणार आहे.
           आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नंद गणपती संग्रहालय मोथा चिखलदरा, ब्राह्मण सभा अकोला व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती पासून गणपती मूर्ती बनविण्याची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीसह पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करून गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाला सामाजिक स्वरूप देता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेल्या अभिनव कल्पनांना या स्पर्धेमुळे वाव मिळाला. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मूर्ती ह्या नंद गणपती संग्रहालय मोथा चिखलदरा येथे ठेवण्यात येणार आहेत. नंद गणपती संग्रहालय या ठिकाणी जगभरातील विविध स्वरूपाच्या गणपती मूर्तींचा संग्रह आहे. चिखलदरा ते परतवाडा मार्गावर मोथा गावाजवळ हे संग्रहालय असून पर्यटकांमध्ये ते लोकप्रिय ठरत आहे. एकाच ठिकाणी 6500 हून अधिक गणपती मूर्तींची रूपे पर्यटक अनुभवत आहेत. नंद गणपती मूर्ती संकलनाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मूर्ती या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे या संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख यांनी सांगितले आहे. 
        वर्ग पाच ते सात, वर्ग आठ ते दहा व त्यापुढील अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय 2000 असे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सुवर्णा सुनील कुमार नागपुरे व शरद कोकाटे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेला प्रदीप नंद, सौ. दिपाली नंद, अविनाश देव, सौ. संगीता जळमकर, कीर्ती चोपडे, सौ. रागिनी बक्षी, सौ. वैशाली पाटील, सौ. कीरण मुरूमकर, डॉ. माधव देशमुख, निलेश देव, निशिकांत बडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या 14 सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता जठारपेठ येथील बाल शिवाजी शाळेत या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. अशी माहिती ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी दिली.

    Post Views:  120


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व