दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या अस्मिता मिश्रा यांचे सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Dec 2025, 12:39 PM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत. दिव्यांगांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी संस्था विविध सौंदर्य स्पर्धेत दिव्यांगांना पाठवीत असून सदर स्पर्धेत दिव्यांग बांधव यश संपादन करीत आहेत. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची सदस्य अस्मिता मिश्रा यांनी नागपूर येथे झालेल्या खिलते सितारे फाउंडेशनच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून अकोल्याचे नाव चमकवले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे झालेल्या कस्तुरी राईस फाउंडेशनच्या सौंदर्य स्पर्धेतही अस्मिता मिश्रा यांनी बाजी मारली आहे. ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून दिव्यांग स्पर्धक उपस्थित होते. अस्मिता आपल्या यशाचे श्रेय दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे, आई अरुणा सोळंके, अजिंक्य फिटनेसचे धनंजय भगत, कुटुंबीय व प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणींना देते. यापुढे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचा मानस अस्मिता मिश्रा व्यक्त करते. ज्या दिव्यांग महिलांना विविध स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान डॉ. संजय तिडके यांनी केले आहे. या यश संपादनाबाबत दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सौ. भारती शेंडे, डॉ. संतोष हुसे, अनुराधा साठे, नीता वायकोळे, विजया मानमोडे, सुरज कडू, अंजली तंटपाले, आसिफ शेख, तेहमिना मिर्झा,यांनी अस्मिता मिश्रा यांचे अभिनंदन केले आहे.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या या सामाजिक उपक्रमाचे भारतातील विविध समाज माध्यमावर कौतुक केले जात आहे.
Post Views: 16