वानखेड येथे अवैध औषध विक्रीविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Apr 2026, 9:48 AM
संग्रामपूर : तालुक्यात वाढत्या अवैध औषध विक्रीच्या विरोधात पत्रकार स्वप्निल अशोकराव देशमुख यांनी वानखेड येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १६ एप्रिल) सकाळी १० वाजता हे उपोषण सुरू झाले असून, यामागे जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील अनेक मेडिकल स्टोअर्स विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करून औषध विक्री करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ काही निवडक दुकानांवर कारवाई करून प्रसिद्धी मिळवली, मात्र संपूर्ण तालुक्यातील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
माझा श्वास थांबला तरी चालेल, पण तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. प्रशासनाने आता जागे व्हावे, असा भावनिक सूर देशमुख यांनी व्यक्त केला. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये संपूर्ण तालुक्यातील मेडिकल स्टोअर्सची पारदर्शक तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई, दोषींची नावे सार्वजनिक करणे, तसेच रुग्णांना योग्य दरात दर्जेदार औषधे मिळण्याची लेखी हमी देणे यांचा समावेश आहे. याशिवाय, दर तीन महिन्यांनी नियमित तपासणी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान शटर बंद करून पळ काढणाऱ्या दुकानदारांवरही कठोर कारवाई करावी, तसेच फार्मासिस्ट नसलेल्या मेडिकल दुकानांना तत्काळ सील करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, “हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून अन्यायाविरोधात आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील,” असा इशारा देशमुख यांनी दिला.
Post Views: 24