पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून विजेचे दर वाढवले : जयंत पाटील
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
18 Jul 2022, 8:44 PM
मुंबई : महाराष्ट्राच्या बर्याच भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी संकटात सापडला असून, जिरायत शेतीला तत्काळ 50 हजार, बागायत शेतीला एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली.
राज्यातील जनता संकटात असताना सरकारचे मंत्रिमंडळ जागेवर नसल्याची टीका करून या सरकारने पेट्रोल डिझेलची दर कपात करून विजेचे दर वाढविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राज्यात विजेची 20 टक्के दरवाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दिलासा दिला, मात्र तो दिलासा विजेचे दर वाढवून हिरावून घेण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले, असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.
मागच्या अर्थसंकल्पातील कामे आणि आताच्या कामांना स्थगिती दिली ती उठवावी, अशी मागणी करतानाच सरकार येत असतात, जात असतात. त्यामुळे जनतेच्या कामांना स्थगिती देणे योग्य नाही, त्यामुळे तत्काळ ती कामे सुरू करावीत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील राजकीय घडामोडीवर तीन सदस्य खंडपीठ नेमलेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात योग्य निर्णय लागेल. पक्षांतर्गत वाद झाल्यावर सुप्रीम कोर्टाने तत्काळ आदेश द्यायला हवा होता आता ते घडेल असे वाटते. पक्षांतर्गत कायदा, नियम पायदळी तुडवून कोण सत्तेत येत असेल तर कडक कारवाईही करण्यात यायला हवी, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. सरकारचा विस्तार करणे न करणे त्यांचा विषय आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जाग्यावर नाही, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
Post Views: 248